This is a Marathi translation of my talk and presentation “Bombay Time: Power, Public Culture & Identity, 1870-1955”
‘बॉम्बे टाइम: टर्निंग बॅक द क्लॉक, १८७०–१९५५’ हे माझं सादरीकरण डाउनलोड करण्यासाठी इथं क्लिक करा. आमचे मित्र व मार्गदर्शक प्राध्यापक जिम मॅसेलोस यांच्या सन्मानार्थ मुंबई विद्यापीठाचा इतिहास विभाग, लंडन विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ ओरिएन्टल अँड आफ्रिकन स्टडीज्’ (एसओएएस) आणि लाइकेस्टर विद्यापीठ यांनी इतिहासकार, अभ्यासक व संशोधकांची एक परिषद शुक्रवार ६ ते शनिवार ७ जानेवारी २०१७ या दिवसांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी आवारामध्ये आयोजित केली होती. प्राध्यापक मंजिरी कामत, प्रशांत किदम्बी व रेचल ड्वायर यांनी ही परिषद आयोजित केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
रेल्वे, तारायंत्रं व वाफेवर चालणारी जहाजं यांचं जागतिक जाळं ब्रिटीशशासित भारतात आणि जागतिक पातळीवर १८७०–१८८०च्या दशकांमध्ये पूर्ण झालं. या सर्व संदेशन व वाहतूक मार्गांदरम्यानच्या वेळेसंबंधित इशाऱ्यांचं संयोजन करणंही शक्य झालं, कारण अचूक रेखांशीय वेळ मद्रास व मुंबई अशा शहरांमधून एकाच वेळी त्यांच्या विस्तारीत भौगोलिक व समुद्री सीमांपर्यंत विद्युतमार्गे पाठवण्याचं काम निरीक्षणशाळा करत होत्या. पण शहरातील वेळमापन प्रमाणित करण्याच्या प्रयत्नांना नागरी पर्यावरणातील अनेक दृश्य व श्राव्य कालबाधित चिन्हांना सामोरं जावं लागलं: सार्वजनिक घड्याळं, कारखान्यांचे भोंगे, कार्यालयीन पाळ्या, रेल्वेची वेळापत्रकं, सूर्योदय व सूर्यास्त हे घटक होतेच; शिवाय या महाकाय उपखंडात पूर्वेकडे कलकत्त्यापासून ते पश्चिमेतील कराचीपर्यंत स्थानिक सौरवेळा तासाभरापेक्षाही अधिक अंतरानं बदलत्या होत्या.
वासाहतिक वैज्ञानिक व राज्यसंस्थेनं वेळेच्या बाबतीत एकवाक्यता आणण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. पण वासाहतिक भारतातील प्रमाणित वेळेसंबंधीच्या अशा ठिगळकामातून वैज्ञानिक, बंदर, रेल्वे व महापालिका प्रशासन यांच्यात परस्पर स्पर्धेचा भाव निर्माण झाला. धार्मिक व नागरी नेते, व्यापारी व नागरी जनता यांनी या प्रमाणकांना सातत्यानं धुडकावून लावलं. मद्रास निरीक्षणशाळेच्या रेखांशानुसार निश्चित केलेल्या ‘प्रमाण वेळे’ला मुंबईतील लोकांनी कठोर विरोध केला. आंतरखंडीय रेल्वे–मार्ग पूर्ण झाल्यावर १८७०च्या दशकात मुंबईसोबत निश्चित करण्यात आलेली ही वेळ ‘रेल्वे टाइम’ म्हणूनही ओळखली जात होती. पण मुंबईतील स्थानिक सौरवेळेपेक्षा किंवा ‘बॉम्बे टाइम’पेक्षा मद्रास निरीक्षणशाळेची ही नवीन प्रमाणित वेळ तीस मिनिटांनी पुढं होती. त्यामुळं विरोध झाल्यावर घाईगडबडीनं ही वेळ मागे घेण्यात आली.
त्यानंतर, १९०५–०६मध्ये सुरू असलेलं स्वदेशी आंदोलन, लोकमान्य टिळकांना झालेली अटक व त्यांच्यावरील खटला या घडामोडींच्या काळात ‘भारतीय प्रमाण वेळ’ अंमलात आली, त्यातून जनक्षोभात वाढच झाली. सरकारनं घड्याळ अर्धा तासाहून अधिक अवधीसाठी मागं फिरवायचा प्रयत्न केल्यावर, सार्वजनिक घड्याळांच्या मनोऱ्यांवर दगडफेक करण्यापासून ते कार्यालयीन कर्मचारी व कारखान्यातील कामगारांनी संप करण्यापर्यंत विविध मार्ग निषेधासाठी अवलंबण्यात आले. त्यानंतर मुंबईमध्ये देशी वेगळेपणा दर्शवण्यासाठी मानचिन्हासारखा ‘बॉम्बे टाइम’चा वापर सुरू झाला. ‘वेळेनं केलेलं अवकाशाचं उच्चाटन’ नाकारण्यासाठी नागरी कालबद्धतेच्या स्थलावकाशातला एक रोजचा प्रतिकार म्हणून हा व्यवहार सुरू होता. भारतीय कामगार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी काम सुरू झाल्यावर थोड्या अवधीनं ‘बॉम्बे टाइम’ सुरू होत असे; देशी बँकर व ब्रोकरांना युरोपीय व्यावसायिक बँकांपेक्षा जास्तीचा काही वेळ काम सुरू ठेवता येत असे; आणि अधिकृत भारतीय प्रमाण वेळेपेक्षा भिन्न वेळ दाखवणाऱ्या सार्वजनिक घड्याळ्यांना स्थानिक समाजसेवक व नेते पाठबळ देत असत.
जिम मॅसेलोस यांच्या “बॉम्बे टाइम” (मीरा कोसम्बी संपादित ‘इंटरसेक्शन्स: सोशिओ–कल्चरल ट्रेन्ड्स इन महाराष्ट्र’, हैदराबाद: ओरिएन्ट लॉन्गमन, २०००, पानं १६१–८३) या निबंधाचं पुनर्वाचन मी माझ्या पेपरमध्ये केलं आहे. वासाहतिक मुंबईतील घड्याळी वेळेच्या प्रमाणीकरणासंबंधी मॅसेलोस यांनी केलेलं काम आद्य स्वरूपाचं आहे. मॅसेलोस यांच्या मांडणीला पूरक सखोलता मिळेल अशी मांडणी करायचा प्रयत्न मी प्रस्तुत पेपरद्वारे केला आहे. ‘बॉम्बे टाइम’मुळं शहरातील सामाजिक रचना आणि वेळेची नीती–अर्थव्यवस्था कशा रितीनं बदलली हे शोधायचा प्रयत्न मी केला आहे. तांत्रिक बदलाच्या संदर्भात नागरी जीवनामध्ये घडून येणाऱ्या परिवर्तनासंबंधी मॅसेलोस यांनी दिलेल्या मर्मदृष्टीचा विस्तार करताना मी महानगरपालिकेच्या व सरकारच्या दस्तावेजांमधील नवीन सामग्रीचा विचार केला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व स्वातंत्र्यानंतर ‘बॉम्बे टाइम’चा अंत कसा झाला, त्याचीही मांडणी केली आहे.