इंदू मिलच्या अंतरंगात मुंबईत साकारतेय वस्त्रोद्योग संग्रहालय

This is a Marathi translation by Avadhoot of Inside Indu Mills: A Textile Museum for Mumbai which was published in Loksatta on Sunday 11 November 2018. You can read the story online here or download the print version as a PDF.

मुंबईतील ६० सुती कापड गिरण्यांपैकी बहुतांश गिरण्या गेल्या २० वर्षांमध्ये बंद पडल्या अथवा त्यांच्या जागेचा पुनर्विकास करण्यात आला. जनतेसाठी कायमच अदृश्य राहिलेला हा प्रचंड वारसा आता शहरातून जवळपास लुप्त झालेला आहे. या गिरण्यांची आवारं अवाढव्य भिंतींनी बंदिस्त केलेली असल्यामुळे आतील भाग नजरेपल्याडच राहायचा, पण २०००च्या दशकात उड्डाणपूल व उंच इमारती उभ्या राहू लागल्यावर नजरेचा टप्पाही पलटला. जागतिक औद्योगिक क्रांतीच्या काळात निर्माण झालेल्या अगदी पहिल्या काही कारखान्यांमध्ये मुंबईतील कापडगिरण्यांचा समावेश होतो. ‘पूर्वेकडील मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या गेलेल्या तत्कालीन बॉम्बे शहरात मध्यवर्ती ठिकाणी या गिरण्यांना जागा मिळाली.

यातील बहुतांश आवारांची जागा आता नवीन जागतिक अर्थव्यवस्थेतील कार्यालयं, मॉल, बँका व गगनचुंबी इमारतींनी घेतली आहे, पण काही मोजक्या गिरण्यांच्या जागेचं व्यवस्थापन अजूनही केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडे (नॅशनल टेक्सटाइल कॉर्पोरेशन: एनटीसी) आहे. यांपैकी काळाचौकी परिसरातील ‘इंडिया युनायटेड मिल क्रमांक २-३’ या आवारांचं रूपांतर शहरातील नव्या व सर्वांत मोठ्या संग्रहालयात होणार असून त्यासाठीची योजना मुंबई महानगरपालिकेकडून अंमलात येते आहे. एनटीसीनं महानगरपालिकेला दिलेल्या पंधरा बंद गिरण्यांपैकी ही एक आहे.

मुंबई, महाराष्ट्र व भारतातील वस्त्रोद्योगाच्या इतिहासाला वाहिलेलं या गिरणीचं जीर्णोद्धारित आवार २०१९च्या सुरुवातीला टप्प्याटप्प्यानं खुलं केलं जाईल. बरोब्बर दीडशे वर्षांपूर्वी, १८६९ साली या जागेवर वस्त्रोद्योग गिरणी सुरू झाली होती. शहरातील सर्वांत जुन्या कापडगिरण्यांपैकी एक असलेल्या या ‘इंदू मिल’चं आणि तिथल्या संपन्न औद्योगिक वारश्याचं अंतरंग पाहायची संधी मुंबईतील बहुतांश नागरिकांना या निमित्तानं पहिल्यांदाच मिळेल. यापूर्वी, भारतातील पहिल्या आधुनिक उद्योगाची पायाभरणी मुंबईत करणाऱ्या कामगारांना, कर्मचारीवर्गाला आणि मालकांनाच या आवाराच्या अंतरंगाशी जवळीक साधता येत होती.

इंडिया युनायटेड मिल २-३, (अलेक्झांड्रा अँड ई.डी. ससून मिल्स), काळाचौकी, भायखळा- पूर्व, २०१७
विणकामाची जागा, २-३, जानेवारी २०१८

 

लँकशायर ते भायखळा

या नियोजित संग्रहालयाची जागा दीडशे वर्षं जुनी आहे. उपनगरी भायखळ्याच्या अगदी टोकाला रिअरी रोडवर गोदी-जमिनीवर असलेली ही जागा आधी ‘चिंचपोकळी तेल गिरणी’ या नावानं परिचित होती. त्या वेळी हे आवार भाज्यांचं तेल पिळून काढण्यासाठीचा कारखाना म्हणून वापरात होतं. त्यामुळं मालक व नावं बदलल्यानंतरही जवळपास एक शतकभर गिरणी कामगार आणि स्थानिक लोकही या ठिकाणाला ‘तेलाची गिरण’ असंच संबोधत असत.

जमशेटजी नसरवानजी टाटा (१८३९-१९०४) (स्त्रोत: टाटा सन्स)

पारशी व्यापारी नसरवानजी टाटा (१८२२-१८८६) यांच्या उपनगरी बंगल्याजवळचं हे आवार टाटांच्या कुटुंबातील उद्यमशील वारस जमशेटजी टाटा (१८३९-१९०४) यांच्या नजरेस पडलं. पुढं जाऊन भारतीय उद्योगविश्वाचे उद्गाते ठरलेले जमशेटजी तेव्हा विशीच्या शेवटच्या वर्षांमध्ये होते, आणि औष्णिक ऊर्जेद्वारे सूतकताई व विणकाम करण्याचं नवीन तंत्रज्ञान शिकून नुकतेच इंग्लंडहून भारतात परतले होते.

वडील नसरवानजी टाटा आणि मँचेस्टरमध्ये ओळख झालेले बोहरा मुस्लीम व गुजराती भाषक व्यापारी शेख आदम या दोघांच्या आर्थिक मदतीनं जमशेटजी टाटांनी भायखळ्यातील हे तेलगिरणीचं आवार विकत घेतलं, त्याचा विस्तार केला आणि आयात केलेली यंत्रसामग्री तिथे आणून ठेवली. या ठिकाणी त्यांनी १८६९ साली पहिली सूतगिरणी सुरू केली. ब्रिटिश राजे सातवे एडवर्ड यांच्या पत्नीच्या (वेल्शची नवी युवराज्ञी) नावावरून त्यांनी गिरणीचं नामकरण केलं- ‘अलेक्झांड्रा स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’.

तीन वर्षांच्या आत जमशेटजी टाटांनी ही जागा, तिथल्या इमारती व यंत्रसामग्री हे सगळं भाटिया जैन समुदायातील केशवजी नाईक यांना विकलं आणि बराच नफा कमावला. बांधकाम व्यावसायिक व सट्टेबाज असलेल्या नाईक यांच्या मालकीचा ‘नरसू मिल्स’ हा कारखाना शेजारीच काळाचौकी परिसरात होता. या कारखान्याला त्यांनी इंग्लंडच्या राजावरून ‘कैसर-ए-हिंद मिल्स’ असं नाव दिलं. धाडसी उपक्रम हाती घेऊन त्यांना राजघराण्यावरून नावं द्यायची, या टाटांच्या सवयीची नक्कल केशवजी नाईकांनी केली, पण गिरणी उद्योगात त्यांना फार काळ तग धरता आली नाही. तीन वर्षांनी, १८७५ साली त्यांचं दिवाळं वाजलं. प्रकल्पातील आपल्या सह-प्रवर्तकांची लेखापालनामध्ये फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि १८७८ साली फसवणुकीच्या गुन्ह्याखाली त्यांना दोषी ठरवण्यात आलं. अलेक्झांड्रा मिल्स ही दिवाळखोरीत निघालेली मालमत्ता न्यायालयानं ताब्यात घेतली आणि विक्रीला काढली.

भावी वस्त्रोद्योग संग्रहालय, २-३, जानेवारी २०१८
शीततलाव, २-३, जानेवारी २०१८
कापसाचं कोठार, २-३, जानेवारी २०१८
सूतकताईची जागा, २-३, जानेवारी २०१८

 

व्यापारी आणि उद्योगपती

बंद पडलेल्या ‘अलेक्झांड्रा मिल्स’च्या १८७९ साली झालेल्या न्यायालयीन लिलावामध्ये एलिआस डेव्हिड ‘ईडी’ ससून (१८२०-१८८०) यांनी लावलेली बोली विजयी ठरली. एलिआस हे ज्यू बँकर व व्यापारी डेव्हिड ससून (१७९२-१८६४) यांचे पुत्र होते.

ई. डी. ससून (१८२०-१८८०) (स्त्रोत: विकिमीडिया कॉमन्स)

बगदादमध्ये ओट्टोमान सुलतानांच्या राज्यात बँकर व विद्वान अभ्यासक म्हणून सक्रिय असलेले ससून कुटुंबीय १८५०च्या दशकात धार्मिक अत्याचारांमुळं इराकमधून बाहेर पडले. त्याच दरम्यान, ब्रिटिशांनी भारत व चीनमध्ये जहाजवाहतूक, तारयंत्रणा व रेल्वेजाळ्यांचा विस्तार सुरू केला होता. दुसऱ्या बाजूला, औद्योगिक क्रांतीमुळे अफू, चहा व कापसाच्या जुन्या तिहेरी व्यापाराला ग्रहण लागलं होतं.

एलिआस डेव्हिड ससून (१८२०-१८८०) यांचा जन्म बगदादमध्ये झाला आणि त्यांची जडणघडण कॅन्टन, हाँगकाँग व मुंबईत झाली. आशियातील ब्रिटिश साम्राज्यांतर्गत उभ्या राहिलेल्या नवीन बंदरांमधील ससून कुटुंबियांचा औद्योगिक पसारा ई.डी. ससून यांना वडिलांकडून वारश्यात मिळाला, आणि त्यांनी या उद्योगांचा आणखी विस्तार केला. गुजरातमधील नवसारीहून स्थलांतरित होऊन मुंबईत आलेल्या नसरवानजी टाटा (१८२२-१८८६) या आपल्या समकालीन उद्योजक व व्यावसायिक कुलपित्याप्रमाणे ई.डी. ससून यांचीसुद्धा व्हिक्टोरियाकालीन मुंबईतील विश्वबंधुत्ववादी संस्कृतीमुळं भरभराट झाली. नसरवानजी टाटांनी जमशेटजींना शिकण्यासाठी परदेशात पाठवलं, त्याचप्रमाणे ई.डी. ससून यांनी त्यांच्या दोन मुलांना- सर जेकब ससून (१८४४-१९१६) व सर एडवर्ड एलिआस ससून (१८५३-१९२४) यांना- अनुक्रमे चीन व इंग्लंड इथे स्थानिक बाजारपेठांचा अंदाज घेण्यासाठी आणि कौटुंबिक व्यवसायाचा वाढता जागतिक पसारा समजून घेण्यासाठी पाठवलं.

सर जेकब ससून (१८४४-१९१६) (स्त्रोत: विकिमीडिया कॉमन्स)

ई.डी ससून यांचं १८८० साली कोलम्बोमध्ये निधन झालं, तत्पूर्वी काही महिने त्यांच्या मुलांनी टाटांच्या गिरणीचं नूतनीकरण आणि विस्तारीकरण करून ‘अलेक्झांड्रा अँड ई.डी. ससून स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स’ या नावानं ती पुन्हा सुरू केली.

या वेळेपर्यंत तरुण जमशेटजी पुन्हा एकदा इंग्लंडची वारी करून आले होते. या फेरीत त्यांनी कापूस लागवड व हवामान यासंबंधीचा अभ्यास केला आणि भारतात येऊन आणखी एका नवीन उपक्रमाची पायाभरणी केली. नागपूरजवळच्या ग्रामीण भागात त्यांनी १८७५ साली ‘सेंट्रल इंडिया स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ या नावानं गिरणीची नोंदणी केली. औष्णिक ऊर्जेवर चालणाऱ्या त्यांच्या गिरणीला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा कापूस, स्वस्त कोळसा व पाणी उपलब्ध होणार होतं. त्यानंतर, १८७७ साली व्हिक्टोरिया राणीला ब्रिटिश भारतीय साम्राज्याची सम्राज्ञी (क्विन-एम्प्रेस) घोषित करण्यात आलं, त्या दिवशी जमशेटजींच्या प्रमुख ‘एम्प्रेस मिल’चं कामकाज सुरू झालं.

यानंतरच्या दशकांमध्ये भारतभरात कापडनिर्मितीचा उद्योग वेगानं वाढत गेला. पण उदयोन्मुख वस्त्रोद्योग क्षेत्रातील अद्वितीय केंद्राचा मान मात्र मुंबई शहराकडेच राहिला. शतकाच्या उंबरठ्यावर मुंबईत शंभराहून अधिक सूतगिरण्या उभ्या राहिल्या होत्या, आणि या गिरण्यांची एकत्रित क्षमता व एकूण उत्पादन ब्रिटिशशासित भारतातील इतर सर्व गिरण्यांहून जास्त होतं. परिणामी, मुंबई शहर आशियातील ‘कॉटनपोलिस’ [सुती वस्त्रोद्योगाचं मोठं केंद्र असलेल्या मँचेस्टरला इंग्रजीत कॉटनपॉलिस म्हणत] ठरलं. धर्मशील वृत्तीचे सर जेकब ससून आणि त्यांची पत्नी लेडी राशेल यांच्या मालकीची ‘ई.डी. ससून सन्स’ ही कंपनी या क्षेत्रातील आघाडीची उद्योजक संस्था बनली. लोककल्याणकारी कामांमध्येही या दाम्पत्याचा मोठा सहभाग होता.

विणकामाची जागा/ वस्त्रोद्योग संग्रहालयाचा आतला भाग, २-३, जानेवारी २०१८
विणकामाची जागा/ वस्त्रोद्योग संग्रहालयाचा बाहेरचा भाग, २-३, जानेवारी २०१८

 

भारतातील सर्वांत मोठा वस्त्रोद्योग समूह

ई.डी. यांचे बंधू, म्हणजे सर जेकब यांचे काका अब्दुल्ला- इंग्रजीत अल्बर्ट- यांनी १८७०च्या दशकात कुलाब्यातील ‘ससून डॉक्स’ या गोदीमधील आपला वाटा नवनिर्मित बॉम्बे पोर्ट ट्रस्टला विकला, आणि ते इंग्लंडला निघून गेले. बगदादमधील ससून कुटुंबाचे कुलपिता डेव्हिड ससून यांच्याकडून ई.डी. व अब्दुल्ला यांना वारश्यात मिळालेल्या संयुक्त कौटुंबिक मालकीच्या कंपनीतून ई.डी. त्यांच्या निधनाआधीच विभागणीद्वारे वेगळे झाले होते. त्यानंतर ‘ई.डी. ससून सन्स’ या नव्या कंपनीची जबाबदारी सर जेकब यांनी घेतली. दरम्यान, त्यांचे धाकटे बंधू सर एडवर्ड यांनी आपला मुक्काम इंग्लंडला हलवला आणि लंडनमधील नवीन कार्यालयाची सूत्रं हाती घेतली. मूळची ‘डेव्हिड ससून सन्स’ ही कंपनी चालवणाऱ्या आपल्या चुलत भावंडांसोबत सस्नेह स्पर्धा सुरू ठेवण्याचं काम लंडनच्या कार्यालयातून होऊ लागलं.

विणकाम विभाग, १ (जेकब ससून मिल्स), लालबाग, परळ, २००१

सर जेकब यांनी १८९० साली दादरच्या किनाऱ्यावर ‘टर्की रेड डाय वर्क्स’ हा प्रगत रासायनिक व खनिज कारखाना उभारला (इंडिया युनायटेड क्र. ६), त्यापाठोपाठ १८९३ साली त्यांनी लालबागमध्ये नामांकित जेकब मिल्सची (क्र. १) उभारणी केली. त्यांच्या पत्नीच्या नावानं १८९५ साली ‘राशेल मिल्स’ (क्र. ४) ही गिरणी सुरू झाली. त्यानंतर शेजारच्या भायखळ्यातील ‘हाँगकाँग अँड मँचेस्टर मिल्स’ (क्र. ५) ही गिरणीही सर जेकब यांनी १९००च्या दशकात विकत घेतली, आणि वरळी व लोअर परेल या भागांमध्ये आपल्या धाकट्या भावंडांच्या नावानं ‘एडवर्ड अँड मेयर ससून मिल्स’ सुरू केली.

या वेळेपर्यंत मूळच्या ‘अलेक्झांड्रा अँड ई.डी. मिल्स’ या गिरणीच्या पंधरा एकर आवारामध्ये सहा हजारांहून अधिक कामगार काम करत होते. विविध प्रकारची धोतरं, मध्यम स्तराच्या साड्या, शर्ट व लांब कापडं या ठिकाणी तयार केली जात, आणि रीड व हेआल्डचं उत्पादनही केलं जात असे. लालबाग, भायखळा व परळ भागांमधील इतर गिरण्या व रंग कारखान्यांमध्ये चादरी, कोटाचं कापड, कांबळी, खाकी कापड, तलम सूत, यांच्या निर्मितीसह इतर विणकाम व खनिज रंग प्रक्रिया चालत असत.

प्रगत तंत्रज्ञान व उत्पादन प्रक्रिया यांसाठी प्रख्यात असलेला ई.डी. ससून समूह पहिल्या महायुद्धापर्यंत भारतातील सर्वांत मोठा वस्त्रोद्योग समूह बनला. या समूहाचे प्रतिनिधी भारत, आशिया, मध्यपूर्व व ब्रिटिश साम्राज्यात इतरत्र पसरलेले होते. आपल्या स्थलांतरित वडिलांच्या व्यापारी संस्थेला महाकाय उद्योगामध्ये रूपांतरित करणाऱ्या सर जेकब व लेडी राशेल यांना त्यांचा भारतातील औद्योगिक व्याप व लोककल्याणाची कामं वारश्यात हस्तांतरित करण्यासाठी स्वतःचं मूल नव्हतं.

ई.डी. ससून अँड कंपनीची जाहिरात, इंडियन टेक्सटाइल जर्नल, १९४०
सरकी काढलेल्या कापसाची गासडी. पुण्यातील लॉर्ड रे इंडस्ट्रीयल म्युझियममधील स्वदेशी प्रदर्शनाला ई.डी. ससून युनायटेड मिल्सकडून भेट देण्यात आलेल्या वस्तूंमधून, १९३३ (आताचं: महात्मा फुले वस्तु संग्रहालय)

 

साम्राज्याचा अस्त

सर एलिआस व्हिक्टर ससून (१८८१-१९६१) हे सर जेकब यांचे बंधू एडवर्ड यांचे पुत्र होते. इंग्लंडमध्ये जडणघडण झालेल्या सर व्हिक्टर यांना विमानचालनात प्रचंड रस होता, आणि पहिल्या महायुद्धात वैमानिक म्हणून काम करताना जखमी झाले होते.

व्हिक्टर यांनी भारतात येऊन ‘ई.डी. ससून्स सन्स’ची सूत्रं हाती घ्यावीत, अशी विनवणी मृत्युशय्येवरील त्यांचे काका सर जेकब यांनी केली. त्यानुसार १९१६ साली युद्धकाळात सर व्हिक्टर भारतात आले. त्यांचे वडील व जेकब यांचे बंधू सर एडवर्ड एलिआस यांचा मृत्यू १९२०च्या दशकात झाला, तोपर्यंत सर व्हिक्टर यांनी मुंबईतील कौटुंबिक व्यवसायामध्ये परिवर्तन घडवलं. त्यांनी कंपनीच्या जुनाट व्यवस्थापनाचं कालसुसंगत सुसूत्रीकरण केलं, गिरण्यांमधील यंत्रसामग्रीला आधुनिक रूप देऊन त्याचा विस्तार केला. औष्णिक ऊर्जेवर चालणाऱ्या गिरण्यांना त्यांनीच वीजकर्षणाच्या मार्गावर आणलं.

सर व्हिक्टर यांच्या नवीन मुख्यालयाची- म्हणजे पोर्ट ट्रस्टच्या नवीन बलार्ड इस्टेटमधील ‘ई.डी. ससून बिल्डिंग’ची (आताचं ‘एनटीसी हाऊस’)- रचना विख्यात ब्रिटिश वास्तुरचनाकार जॉर्ज विटेट यांनी केली होती. साठ वर्षांपूर्वी स्थलांतरित होऊन मुंबईत आलेल्या ससून कुटुंबियांच्या गिरणीउद्योगाचे सार्वजनिक समभाग विक्रीला काढण्याचा निर्णय सर व्हिक्टर यांनी याच इमारतीमधील कार्यालयातून १९२६ साली जाहीर केला. राजघराण्यातील प्रस्थापितांची व परकियांची नावं देण्याची पद्धत दोन महायुद्धांमधल्या काळात चलनातून बाद होत गेली. त्याच दरम्यान सर व्हिक्टर यांनी त्यांचे काका, आत्ता व चुलत भाऊ यांची नावं असलेल्या सहा गिरण्यांचं एकत्रीकरण करून त्यांना ‘ई.डी ससून युनायटेड मिल्स’ (EDSU) असं नाव दिलं.

सर एलिआस व्हिक्टर ससून (१८८१-१९६१) (स्त्रोत: worldhistory.us)
एनटीसी हाउस, आधीची ई.डी. ससून बिल्डिंग (१९२६-४५) आणि इंदू हाउस (१९४५-७४); मुख्यालय, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (महाराष्ट्र), बलार्ड इस्टेट

 

जगभरात १९२९-३० या वर्षांमध्ये महामंदीची लाट पसरली. या लाटेमध्ये बाजारपेठेतील मोठमोठ्या स्पर्धकांचं दिवाळं वाजलं, पण सर व्हिक्टर यांच्या नेतृत्वाखालील ‘ई.डी. ससून अँड कंपनी’नं मुंबईमधील अधिकच्या दहा गिरण्या विकत घेतल्या. एलफिस्टन, डेव्हिड, अपोलो मिल्स, मँचेस्टर (इंडिया युनायटेड क्र. ५) आणि इंडिया वूलन मिल्स आदी गिरण्यांचा या व्यवहारात समावेश होता. यातून मिळालेला नफा सर व्हिक्टर यांनी शांघायमध्ये लक्झरी हॉटेलांच्या आणि स्थावर मालमत्तेच्या व्यवसायात गुंतवला. तिथल्या ‘बंड’ या नावानं परिचित नदीकिनाऱ्याजवळच्या परिसराला मुंबईतील अपोलो बंदराप्रमाणे एडवर्डियन व आर्ट डेको प्रकारची सजावट देण्यात आली. सर व्हिक्टर यांना या ढंगातील रचना आवडत असत.

युरोपात दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं, तेव्हा ‘ई.डी. ससून’ ही कंपनी मुंबई शहरातील सर्वांत मोठा खाजगी रोजगारदाता ठरली. या कंपनीच्या वस्त्रोद्योगात, लोकर गिरण्यांमध्ये, रंग कारखान्यांमध्ये, कार्यालयांमध्ये व दुकानांमध्ये मिळून ३० हजार कामगार, व्यवस्थापक व इतर कर्मचारीवर्ग कार्यरत होता. मध्यपूर्व, दक्षिण व पूर्व आशिया इथल्या भारतीय व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांकडून केल्या जाणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या कंपनीच्या पंधरा गिरण्या उत्साहानं कामाला लागल्या होत्या. युरोप व आशिया खंडांत दोस्त राष्ट्रांना यश मिळायला लागल्यावर भारतातील ससून समूहाच्या लाभांमध्ये वेगवान वाढ होत गेली.

या युद्धात जपानी सैन्यानं चीनवर आक्रमण केल्यानंतर शांघायमधील मालमत्ता सर व्हिक्टर यांना जवळपास गमवाव्या लागल्या. त्यांनी उभारलेल्या प्रसिद्ध कथाय हॉटेलचाही या नुकसानीमध्ये समावेश होता. त्यानंतर लगेचच कम्युनिस्टांनी त्यांना चीन सोडून जाण्यास सांगितलं आणि युद्धजर्जर शांघायमधील त्यांचा उरलासुरला व्यवसाय जप्त केला.

शांघायमधील नुकसान भरून काढण्यासाठी सर व्हिक्टर यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीला मुंबईतील आपला सर्व कौटुंबिक उद्योग ‘मेसर्स अगरवाल अँड कंपनी’ या मारवाडी व्यापाऱ्यांच्या संस्थेला विकून टाकला. मुंबईतील बॅरोनेट किताबधारी ससून कुटुंबियांमधील शेवटचे मानकरी सर व्हिक्टर ससून यांनी आयुष्याचा अखेरचा काळ बहामा बेटांवर व्यतीत केला. “भारतावरचा माझा विश्वास संपुष्टात आला आणि माझ्यावरचा चीनचा विश्वास संपुष्टात आला,” असं ते बहामामधील मित्रांना सांगत असत.

सूतकताई यंत्र, १, (जेकब ससून मिल्स), लालबाग, २००१
इंदू फॅब्रिक्स व इंडिया युनायटेड मिल्स यांची जाहिरात, इंडियन टेक्सटाइल जर्नल, १९५५

 

गिरणी ते संग्रहालय

अगरवालांनी ही गिरणी ‘इंदू फॅब्रिक्स’ या नावानं १९६०च्या दशकापर्यंत नफादायी पद्धतीनं चालवली आणि युद्धकाळात ससून यांनी वाढवलेलं उत्पादन त्यांनी १९६०च्या दशकापर्यंत टिकवलं. (स्वातंत्र्योत्तर काळात ‘इंदू’ या ब्राण्डचं नाव सर्वत्र पसरलं होतं). त्यानंतर, १९७४मध्ये इंदिरा गांधींच्या सरकारनं इंडिया युनायटेडच्या संपूर्ण गिरणी समूहाचं राष्ट्रीयीकरण करून राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडे (नॅशनल टेक्सटाइल कॉर्पोरेशन: एनटीसी) त्याची जबाबदारी दिली. २०००च्या दशकात मुंबईतील या व इतर खाजगी सूतगिरण्यांचा गाशा गुंडाळण्यात आला.

गिरणीच्या जागेसंबंधीचा पहिला प्रस्ताव २००९ साली मांडण्यात आला. या योजनेनुसार, एनटीसीनं ‘इंडिया युनायटेड मिल्स क्र. २-३’चं आवार आरक्षित सार्वजनिक जागा म्हणून शहर प्रशासनाकडे सुपूर्द केलं. आता, महापालिकेच्या निर्णयानुसार २०१९ साली हे १५ एकरांचं आवार लोकांच्या वावरासाठी खुलं केलं जाणार आहे. दीडशे वर्षांपूर्वी शहरातील सुरुवातीच्या काही गिरण्या या जागेत उभ्या राहिल्या; तिथे आता मुंबईतील, महाराष्ट्रातील व भारतातील वस्त्रोद्योगाचा इतिहास आणि भविष्य उलगडून दाखवणारं संग्रहालय उभं करण्याची योजना आहे. या संग्रहालयात हातमागापासून ते गिरण्यांपर्यंत आणि आधुनिक यंत्रमागापर्यंत वस्त्रोद्योगाचा समग्र प्रवास जतन केला जाणार आहे.

/ गिरणीचं जुनं गेट व टाइम ऑफिस
चिमणी, २-३, जानेवारी २०१८

दुर्दैवानं, जागेचं दुर्भीक्ष्य असलेल्या मुंबई शहरातील इतर चौदा गिरण्यांच्या आवारांबाबत स्पष्ट योजना एनटीसीनं अजूनही तयार केलेली नाही (यामध्ये ससून-इंदू मिल्सची तीन आवारंही आहेत). ससून समूहातील प्रमुख गिरणी- म्हणजे जेकब ससून मिल किंवा इंडिया युनायटेड मिल क्र. १ ही एकेकाळी शहरातील सर्वांत मोठा कारखाना होती आणि त्यात १२ हजारांहून अधिक कामगार नोकरीला होते.

आजघडीला लालबाग उड्डाणपुलावरून जाताना या गिरणीच्या आवाराचा अक्षरशः चुराडा होताना दिसतो. मुंबई शहराला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणाऱ्या तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या टप्प्याचं मूक स्मारक बनलेली ही जागा आज खंगल्या अवस्थेत आहे. याच जागेवरून टाटा व ससून कुटुंबियांनी भारताच्या औद्योगिकीकरणाची पायाभरणी केली होती.

या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या पहिल्या गिरणीमध्ये उभ्या राहणाऱ्या नवीन संग्रहालयाच्या माध्यमातून नागरिकांना विस्मृतीत गेलेला औद्योगिक वारसा पुनरुज्जीवित करायची संधी मिळणार आहे. या वारश्याला नजरेआड करून मुंबईतील उद्योजकता व विश्वबंधुत्व या विख्यात मूल्यांची कल्पना करणं अवघड आहे.

 

या लेखातील सर्व छायाचित्रं मी ‘युनायटेड मिल क्र. १,२-३’ या ठिकाणी २००१ व २०१८ या वर्षांत ‘राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ’ आणि ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स अँड आर्किटेक्चर’ यांच्या सौजन्याने काढलेली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *